*विकासकामांच्या उद्घाटनांसह ‘नो प्लास्टिक’चा संदेश : सहपालकमंत्री ॲड. आशिष जयस्वाल यांचा स्पष्ट इशारा*
गड़चिरोली 01 में
अमितकुमार तिपट्टी
जिल्ह्यातील विविध विकासकामांना गती देत नागरिकांना मूलभूत सुविधा उपलब्ध करून देण्याच्या दृष्टीने सहपालकमंत्री ॲड. आशिष जयस्वाल यांच्या हस्ते आज विविध ठिकाणी महत्त्वपूर्ण उद्घाटने व विकास कामांचे लोकार्पण पार पडले. आरोग्य, पशुसंवर्धन, महिला व बालकल्याण तसेच पर्यावरण संवर्धनाशी संबंधित उपक्रमांना यावेळी विशेष प्राधान्य देण्यात आले.
मेंढा येथे आयुष्यमान भारत आरोग्य उपकेंद्राचे उद्घाटन सहपालकमंत्री यांच्या हस्ते करण्यात आले. या उपकेंद्रामुळे ग्रामीण भागातील नागरिकांना दर्जेदार प्राथमिक आरोग्य सेवा उपलब्ध होणार असून आरोग्य व्यवस्थेला अधिक बळकटी मिळणार आहे.
आमिर्झा येथे पशुवैद्यकीय दवाखान्याचे उद्घाटन करण्यात आले. याच ठिकाणी जिल्ह्यातील पहिले जनावरांच्या स्नानगृहाचे लोकार्पणही करण्यात आले. सहपालकमंत्री ॲड. आशिष जयस्वाल यांनी स्वतः येथे गाईला स्नान घालून या सुविधेचे महत्त्व अधोरेखित केले.
इंजेवारी येथे नवीन अंगणवाडी इमारतीचे उद्घाटन करून बालकांच्या पोषण व शिक्षणासाठी आवश्यक पायाभूत सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या. त्यानंतर देऊळगाव येथील मुख्यमंत्री पंचायत राज अभियानांतर्गत मोकळ्या जागेत ग्रामपंचायतीने लोकसहभागातून उभारण्यात आलेल्या नर्सरीला भेट देऊन पाहणी करण्यात आली. या नर्सरीमध्ये सुमारे १००० आंबा व ७०० शेवगा रोपांची लागवड करण्यात आली असून पर्यावरण संवर्धनासह उत्पन्नवाढीच्या दृष्टीने हा उपक्रम उपयुक्त ठरणार असल्याचे त्यांनी नमूद केले.
*प्लास्टिकमुक्तीचा संदेश*
*दौऱ्यादरम्यान काही ठिकाणी स्वागतासाठी देण्यात येणारे पुष्पगुच्छ प्लास्टिक आवरणात असल्याचे निदर्शनास येताच सहपालकमंत्री यांनी ते स्वीकारण्यास नकार दिला. प्लास्टिकमुळे मोठ्या प्रमाणात कचरा निर्माण होतो, त्याची विल्हेवाट लावणे कठीण ठरते आणि पर्यावरण तसेच आरोग्यावर त्याचे दुष्परिणाम होतात, असे स्पष्ट करत त्यांनी प्लास्टिकचा वापर टाळण्याचे आवाहन केले. यापुढे प्लास्टिक आवरणातील पुष्पगुच्छ देण्यात आल्यास संबंधितांवर कारवाई करण्यात येईल, असा इशाराही त्यांनी दिला.*
या दौऱ्यात सहपालकमंत्री यांचे समवेत जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी सुहास गाडे, आमदार रामदास मसराम, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी राजेंद्र भुयार, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेचे प्रकल्प अधिकारी राहूल काळभोर, उपमुख्य कार्यकारी अधिकारी (महिला व बालविकास) दीपक बानाईत व इतर संबंधित अधिकारी व नागरिक उपस्थित होते.


Post a Comment
0 Comments